*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा*
आ.उमेश यावलकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना सुचना !
*दॆनिक कैलिफ़ोर्निया टाईम्स*
वरुड :प्रतिनिधी*
वरूड व मोर्शी तालुक्यात सन् २०२५/२६ या चालु आर्थिक वर्षात अती पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी, कापूस, तूर, सोयाबीन सारखे पिके शेतकऱ्यांच्या घरी येण्याआधीच मातीमोल झाले आहे. या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे तत्काळ सरसकट पंचनामे करण्याबाबत वरूड मोर्शी मतदार संघाचे आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर यांनी जिल्हाधिकारी आशिर येरेकर यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान त्यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांची वास्तव्यास असलेली परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. यामध्ये वरूड व मोर्शी या दोन्ही तालुक्यातील संत्रा, मोसंबी, कापूस, तूर, सोयाबीन, हळद, मिर्ची , मका, हे महत्त्वाचे पिके असुन या सर्व पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित विभागाने दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाव्दारे शासन दरबारी सादर करावा व आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने योग्य न्याय द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही असे कळविण्यात आले आहे.